अरुणाचलचा गुढीपाडवा

जगाच्या पाठीवर कोठेही गेलो तरी आपले सण हेच आपल्याला आपल्या मातीशी जोडून ठेवायचं काम करतात. मग मी तर मागच्या वर्षी आजच्या तिथीला 'चैत्र शुक्ल प्रतिपदेला' अर्थातच गुढीपाडव्याला ठाण्यापासून फक्त 3,036 किलोमीटरवर असणाऱ्या अरुणाचलच्या पासीघाटमध्येच होते. अर्थात भारतातच होते.
त्या दिवशीची सकाळ ही पावसाळी आणि ढगाळ होती. सकाळी उठून नातेवाईक - मित्र-मौत्रिणींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यासोबतच घरातल्या पाडव्याची आठवण आली. मग म्हटलं आपणही इथे गुढीपाडवा - महाराष्ट्राचं नवं वर्ष साजरं करूयात. मग लागलो की तयारीला. माझ्या अरुणाचली बहिणी न्यामोई, इफ्रोमलू आणि संकिना यांना पाडव्याचं महत्त्व सांगितलं.
तयारीत मग काठी, तांब्या (अर्थात तो तांब्याचा नव्हता तरीही तांब्याच), वस्त्र - आता तिथे काठा-पदराचं वस्त्र नव्हतं माझ्याजवळ; पण मात्र त्यांच्या weaving चं design असलेलं वस्त्र होतं ते वापरलं. मग ईफोने कन्याकुमारीहून तिच्यासाठी आणलेल्या शिंपल्यांनी आणि आम्ही लावलेल्या झाडांच्या पानांनी सुंदर असा हार बनवला. तिनं जमवलेल्या छोट्या छोट्या गोष्टींतून शोधून काढून 'नजर लागू नये आणि गुड लक यावं म्हणून वापरला जाणार एव्हील आय' पण त्या हारात ओवला. सगळ्यांनी मिळून बाहेर गुढी उभारली. तिच्याभोवती रांगोळी काढली. रांगोळीचं वैशिष्ट्य हे की तुम्हाला त्यात सूर्य आणि चंद्र दिसतील; हेच ते दोनी-पोलो (Donyi-Polo); अरुणाचलचे आराध्य दैवत.

त्यांनंतर गुढीला ओवाळलं. कडुनिंबाऐवजी तिथं एक फळभाजी मिळते. दिसायला बोरांसारखी पण अतिशय कडू असते. तिची चटणी केली. त्यासोबत फुलके आणि आपल्या पद्धतीने मटाराची उसळ केली. जोडीला वरण-भात लावला. असा सगळ्यांनी मिळून नैवद्य तयार करून आणि जोडीला गोड म्हणून गुलाबजाम आणून गुढीपाडवा साजरा केला. संध्याकाळी आम्ही सगळ्याच छान तयार झालो आणि तिन्हीसांजेला भजनसंध्या केली.
आणि अशी ही 'विविधतेत एकतेची गुढी' महाराष्ट्राने अरुणाचलांत - अरुणाचलच्याच साथीने उभारली.





Comments