top of page
  • Vedanti Vaidya

|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

लहानपणी शाळेतल्या दहीहंडीतून, अर्थ कळत नसला तरी स्पर्धेसाठी पाठ केलेल्या भगवद्गीतेच्या अध्यायातून, कथ्थकच्या कित्तीतरी कवित्त आणि भावांगांतून, महाभारताच्या पार्श्वभूमीवर karma theory वरचं एखादं podcast ऐकताना आपल्याशी संवाद साधतो तो 'कृष्ण'. शाश्वताचा विचार करायला लावणारा आपला friend, philosopher and guide!!! आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो आपल्याला भेटतो, तसाच या भारत देशाच्या विविध भागांत विविध रूपांत तो दर्शन देतो. विवेकानंद केंद्रातर्फे मिळालेल्या संधीतून तो मला भेटला 'माणिपूरला'.

माणिपूरच्या ईस्ट इंफाळ जिल्ह्यापासून 29 kms वर असणाऱ्या Thoubal (थाउबल) जिल्ह्यातील Yairipok गावात Kaina (कायना) या छोट्याश्या टेकाडावर असलेल्या एका फणसाच्या झाडात कृष्णाने दृष्टांत दिला. ही जागा नितांत शांत आणि निसर्गरम्य आहे. फणसाच्या झाडाभोवती एक सुंदर मंदिर बांधलं आहे. त्याच्या मंडपात रासलीलेसाठी आवश्यक असं एक मातीचं मंडल आहे. काही पायऱ्या उतरून गेल्यावर पाण्याचा छोटा तलाव आहे. त्यात धार्मिक विधी करता येतात. मणिपूरच्या वैष्णवपंथीय मैतेई समाजासाठी अत्यंत पवित्र असं हे स्थान आहे. फणसाचे गरे प्रसाद म्हणून मिळण्याचं भाग्य आम्हाला त्यावेळी लाभलं.

याची कथा ती अशी की, 1759 च्या काळात मणिपूर राजर्षि भाग्यचंद्र (महाराज जय सिंग) यांचा बर्माच्या (आत्ताचे म्यानमार) तत्कालीन राजाने पराभव करून मणिपूर जिंकून घेतले. तेव्हा महाराज चंद्रांनी असमचा राजाश्रय घेतला. 'हा महाराज चंद्र नव्हे तर कोणी ढोंगी आहे', असं म्हणत महाराजांच्याच काकांनी असमच्या राजाचे कान भरले. असमच्या राजांनी महाराज चंद्रांना त्यांच्याकडील एक उन्मत्त हत्तीला हरवून आपले राजशौर्य दाखवायची पैज लावली. महाराज चंद्र हे कृष्णाचे निस्सीम भक्त. त्यांनी कृष्णाचा धावा केला आणि कृष्णाने त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना सांगितले की, 'उद्या हत्तीसमोर एक तुळशीची माळ घेऊन उभा रहा आणि असं बघ की त्या हत्तीसमोर एक फणसाचे झाडदेखील असेल. त्या वृक्षरूपात मी तुझं रक्षण करेन. परंतु मणिपूरला परतल्यावर तुला फणसाच्या झाडातून माझी मूर्ती बनवून मंदिराची उभारणी करावी लागेल.' हे मान्य केल्यावर दुसऱ्या दिवशी महाराजांनी तसंच केलं आणि काय आश्चर्य! हत्ती न उधळता महाराजांसमोर नतमस्तक झाला. हे पाहून असमच्या राजांचा महाराज चंद्रांवर विश्वास बसला आणि त्यांनी महाराजांना माणिपूरवर पुनः राज्य प्रस्थापित करण्यास मदत केली. सर्व काही पूर्वीसारखे झाले असता राजा आपले वचन विसरला. परंतु काही काळाने एका लहान मुलाच्या रूपात कृष्णाने महाराजांना वचनाची आठवण करून दिली. महाराजांनी लगोलग kaina (कायना) येथे फणसाचं झाड शोधावयास सुरुवात केली आणि एका झाडाला तोडले असता त्यातून रक्त वाहू लागले. तेव्हा कृष्ण अर्थात श्री गोविंदजी येथेच अवताररूपी असणार हे समजून त्यातून त्यांनी श्रीकृष्णमूर्ती घडवली. अशी 7 ठिकाणी श्रीकृष्णमंदिरे स्थापन केली. 

अशा मणिपुरमध्ये झुलन पौर्णिमेनिमित्त इंफाळ मधल्या सर्वात मोठ्या मंदिरात श्री श्री गोविंदजी मध्ये आम्ही गेल्या वर्षी दर्शन घ्यायला गेलो. आकाशात पौर्णिमेचा चंद्र आणि चंद्रासारखंच पांढरंशुभ्र असं हे संगमरवरी मंदिर. मंडपात मधोमध भजनाचा कार्यक्रम चालू होता. त्यांचेही पोशाख हे पांढरेच. इथं मंदिरात जाताना light रंगांचा पोशाख घालायचा असतो. राधा-कृष्णाला झोका देत आरती व गाणी चालू होती. तितक्यात मंदिरातल्या मुख्य मूर्तींसमोर आरती सुरू झाली. मोठमोठ्या झांजा वाजवून, बाजूला उंचावर बांधलेल्या घंटानादाने तसंच शंखनादानं एकेक-एकेक गर्भगृहाचे दार उघडण्यात येत होतं. पुजारी एका विशिष्ट प्रकारे हातांची हालचाल करून पंचारतींनी देवाला ओवाळत होते. दारासमोर दोन्ही बाजूंनी लोकं line मध्ये उभी होती. आरती झाल्यावर पुजाऱ्यांनी सर्वांवर तीर्थ शिंपडलं. इथं नमस्कार करायची पद्धत ही आपली डावी बाजू देवाकडे ठेऊन वज्रासनात बसून जमिनीवर डोकं ठेऊन नमस्कार करायचा. आता असं का तर देवाला हृद्ययस्थ नमस्कार...देवासमोर केवळ डोकं न टेकवता केलेला हृदयस्थ नमस्कार. प्रसाद म्हणून विष्णुप्रिय कमळ मिळालं. समस्त देवांची 'कमळ बाग' म्हणावी असा लोकताक lake मिळालाय माणिपूरला. त्या पांढऱ्याशुभ्र पार्श्वभूमीवर कमळाचा जांभळट गुलाबी रंग, कानांवर पडणारे भजनाचे सूर आणि प्रत्येक श्वासागणिक शांत करत जाणारा मंद सुवास याने तिथून हलूच नये असं वाटतं होतं. पूर्णतः सात्विक सौंदर्य!

अशा मणिपूरच्या प्रेमात श्रीकृष्णाने पडावं यात नवल ते कसलं!!



21 views0 comments

Recent Posts

See All

Comments


20220810_161701_edited.jpg

Hi, thanks for dropping by!

This site will be used to publish the series of blogs sharing the stories from the north east part of India and the experiences of living across the villages of Arunachal and Manipur states.

bottom of page