डॉ. वसुधा पिंगळे - मु. पो. मणिपूर
- Vedanti Vaidya
- Sep 22
- 2 min read

स्व ला समाजाशी जोडणाऱ्या स्त्रियांबद्दल लिहिण्याचं ठरवलं आणि पहिलं अगदी जवळचं नाव मनात आलं ते म्हणजे वसुधा ताई. त्यांना प्रश्नावली दिली. प्रश्न अर्थातच त्यांच्या पूर्ण प्रवासाबद्दलचे, त्या या कामाकडे कशा वळल्या, प्रसंगी परिस्थितीशी जुळवून घेऊन अतिशय दुर्गम भागात कशा बरं राहिल्या असे काही. त्यांनी केलेल्या आणि करत असणाऱ्या कामाचं काठिण्यत्व सांगणारे. पण गंमत ती अशी की त्यांनी दिलेली उत्तरं ही तितकीच साधी सरळ सोप्पी की कोणालाही वाटावं, की अरे हे तर आपण देखील करू शकतो की. विशेष म्हणजे त्या डॉक्टर पण त्याचं अक्षर मात्र सुरेख वळणदार. प्रश्नांची उत्तरं लिखित असल्याने हे लक्षात आलं. त्यांच्यातील शिक्षकाची ओळख झाली ती त्या अक्षरातूनच.
अशी ही महाराष्ट्र कन्या डॉ.वसुधा पिंगळे. जन्म चिपळूणचा आणि शिक्षण B.H.M.S. काही वर्षे त्यांनी डोंबिवलीत वैद्यकीय प्रॅक्टिस केली. 2010 सालापासून त्या पंढरपूरातील पालवी सामाजिक संस्थेशी जोडल्या गेल्या आणि त्यानंतर प्रॅक्टिस थांबवून त्यांनी संपूर्ण वेळ सामाजिक कार्यांसाठी दिला.HIV positive अनाथ मुलांवर उपचारांचे काम, तसेच इतरही संस्थांमार्फत त्या सक्रिय झाल्या. मुळात हे करावं असं एखाद्याला का वाटतं... याचं अतिशय मार्मिक उत्तर त्यांनी दिलं ते म्हणजे, आपल्या कामाची पाळमुळं ही लहानपणीच ठरतात. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच आई वडिलांनी श्लोक, स्तोत्रांसोबतच गीतेची ओळख करून दिली. पुढील वर्षं सातत्याने गीता पठण त्या करीत आहेत. कळत नकळत ही जी संस्कारांची शिदोरी मिळते तीच या सामाजिक कार्याला वाहून घेण्याच्या निर्णयास कारण ठरली.
आता प्रवास सुरू झाला होता तो ईशान्येचा. डोंबिवलीतील अभ्युदय प्रतिष्ठानतर्फे चालणाऱ्या नागालँड वसतिगृहातील मुलांना शिकवण्याची संधी आली. 2016 - 2018 या कालावधीत त्यांनी ही जबाबदारी घेतली. डोंबिवली हे संस्कृतीचं माहेरघर तर आहेच परंतु अनेक सामाजिक संस्थांना जन्म देणारं आणि मोठं करणारं हे शहर. श्री पुरुषोत्तम रानडेंच्या ईशान्य वार्ता मासिकाला देखील वाचकांसाठी उपलब्ध करून देणाऱ्या शहरानं वसुधा ताईंच्या आयुष्यातलं वळण आखून ठेवलं. प्रथम लेखांचे भाषांतर, मुद्रित शोधन ही कामं करता करता श्री जयवंत कोंडविलकरांशी भेट झाली आणि पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या मणिपूर मधील तीन शाळांबद्दल कळलं. उखरुल, खारासोम - आणि चुराचांदपूर या सीमेलगतील दुर्गम आणि धुमसत्या भागांत, मुलांसाठी या शाळा चालत आहेत. तिथं शिक्षकांची आवश्यकता असल्या कारणाने वसुधा ताईंचा प्रवास त्या दिशेने सुरू झाला.
पेशाने डॉक्टर असूनही स्वतःहून सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणं याला सभ्य भाषेत आपल्याकडे लष्कराच्या भाकऱ्या भाजण या गौरववाणीने संबोधलं गेलं, तरीही या सगळ्याचा स्वतःच्या निर्णयावर परिणाम होऊ न देता त्या मार्गस्थ झाल्या.

2019 पासून त्यांचा मणिपूरचा प्रवास सुरू झाला. दुर्दैवाने मणिपूरची ओळख आपल्याला बातम्यांतून होते, तसंच मणिपूर सामाजिक पातळीवर प्रत्यक्षात देखील असताना तिथं जाणं हे एक धाडसच म्हणायचं. पुण्याच्या कार्यकर्त्या वीणा ताई बेडेकर या 2 वर्षांपासून तिथं होत्या आणि त्यांच्या उपस्थितीमुळे झालेली मदत याचा उल्लेख वसुधा ताई आवर्जून करतात. वसुधा ताईंची नेमणूक ही चुराचांदपूर येथील शाळेत झाली. रहायला बांबूच्या झोपड्या, मिणमिणते दिवे, मोबाईलचं network म्हणजे एक आव्हानच. बरं, जेवणासाठी तिकडच्या भाज्या आणि भात. आता चिपळूण -कोकण, त्यामुळे भाताचं नातं होतंच पण बाकी पदार्थांची - भाज्यांची सवय हळूहळू होत गेली. नीरव शांतता, पण ती इतकी की तीच कधी कधी अंगावर येते, हा माझा अनुभव. कारण मुंबईत फास्ट पेस आयुष्य जगणाऱ्या आणि सतत कानांवर आवाज पडणाऱ्या आपल्याला कुठे झेपतेय ही शांतता. पण अशा वेगळ्याच अनुभव देणाऱ्या जगात वसुधा ताई पटकन मिसळून गेल्या. तेथील मुलांनी गावकऱ्यांनी त्यांना पटकन आपलंस केलं आणि त्यामुळे त्यांना रुळायला मदत झाली.मुळातच मुलांना शिकवण्याची आवड असल्यानं, मुलांमधे मन रमण काही जड गेलं नाही. शिक्षक नव्हे तर गुरू होऊन, अभ्यास आणि वर्तन या दोन्ही बाजूंनी घडवण्याचं काम सुरू झालं. त्याचा परिणाम अर्थातच दिसू लागला तो म्हणजे मुलांच्या अभ्यासातील प्रगतीमधून आणि शाळेत जाण्याची तीव्र इच्छा बघून. बघता बघता सहा महिन्यांत तिसरी - चौथीतली मुलांची तयारी हिंदीतले सोप्पे शब्द लिहिता- वाचता येतील एवढी झाली. भाषा ज्याने संवाद घडतो, ती येणं ही बाब आज ईशान्येच्या राज्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची. उर्वरित भारताबरोबर संवाद साधू शकणारी. 2019 मध्ये मुलांची संख्या 50 होती, तर पुढच्या वर्षी ती वाढून आणि 5वी पर्यंत वर्ग होऊन 200 झाली. वसुधा ताईंच्या कामाची पोचपावती ती याहून वेगळी असूच शकत नाही.

लॉकडाउन मध्ये मात्र शालेय शिक्षणात खंड पडला. तरीही वसुधा ताई तिथंच राहिल्या. काही महिने घरी येऊन पुन्हा परतल्या. शाळेत मूलभूत सुविधा जशा बसायला बाक, पुरेशी स्वच्छतागृहे, वर्गात पुरेसा उजेड, शिक्षकांना रहायला निवास नसतानाही शिकवणं आणि शिकणं अविरत चालूच राहिलं. मुलांच्या घरी साधारण तशीच परिस्थिती त्यामुळे त्यांना ही सोय सवयीचीच. पण वसुधा ताईंच्या मनातील शाळेची प्रतिमा वेगळी असूनही त्यांनी जुळवून घेत शिक्षणपाठ अविरत चालू ठेवला. त्या या मुलांना उत्तम प्रतीची पायाभूत सुविधा देण्याच्या कामात देखील हातभार लावत आहेत.
अलीकडे शिक्षक निवास व पाण्याच्या टाकीची सोय झाली आहे. मुख्यत्वे स्थानिक लोकांकडून मदतीचा हात पुढे आला. इथेच वसुधा ताईंनी त्यांच्या कामाने, त्यांची सातत्याने असलेली उपस्थिती आणि सहज मिसळणारा व आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या स्वभावाने निर्माण केलेल्या विश्वासाचं फल आहे हे लक्षात येतं. भारत जोडो चे खरे शिलेदार तर हेच.
आजची ही मुलं शिकून आणि आदर्श म्हणून त्याग आणि सेवा तत्वांवर कर्मभिमुख असणाऱ्या वसुधा ताईंना सामोरं ठेऊन स्वतःच्या आयुष्यात समाजभिमुख झाली तर त्यात नवल ते कसलं.

आम्ही 2022 मध्ये शाळेला भेट दिली तेव्हा मुलांचे आनंदी चेहरे, त्यांनी म्हणून दाखविलेल्या कविता, गाणी, पाढे आणि प्रामुख्याने सादर केलेले राष्ट्रगीत हे खरोखर अभिमानास्पद होते.
आपल्या महाराष्ट्रातून आलेल्या आणि देशाच्या दुसऱ्या टोकाला येऊन त्यांनी घडवलेली ही मुलं बघताना खूप आनंद झाला. मुलांच्या यशाबद्दल सांगताना वसुधा ताईंना होणारा आनंद हा किती निर्मळ आहे, आणि त्याचं, असं एक हे, मणिपूरचं मोठ्ठं कुटुंब बघताना वसुधैव कुटुंबकम् ची संकल्पना प्रत्यक्षात उतरलेली दिसली.
आज शाळांना, पुढच्या पिढीला अशाच शिक्षकांची, नव्हे तर गुरूंची गरज आहे, जे माणूस म्हणून घडवतील. पैलू पाडतील. लहानपणी तू कोण होणार मोठं झाल्यावर? या प्रश्नाचं सार्वजनिक उत्तर ते म्हणजे शिक्षक/टीचर. ही आपली सुप्त इच्छा एक वर्ष शिक्षक म्हणून देऊन पूर्ण करता येऊ शकते. वसुधा ताईंसारखे प्रेरणास्रोत हे आपल्या सोबत आहेतच. बाकी आहे तो आपला विचार आणि आपली कृती.
Comments