top of page

श्रीमती सुधा शरद देवधर - मला नव्यानं भेटलेली माझी आजी

  • Vedanti Vaidya
  • Sep 24
  • 3 min read

माझी आजी (आईची आई). अतिशय प्रेमळ आणि सुगरण. तिच्या हातचं घावन - गोडं, आंब्याची डाळ, आमटी म्हणजे लाजवाब.माझ्या लहानपणी गौरी आगमनावेळी खड्याच्या गौरी आणताना, चांगले गोल - गोल खडे निवड हो ' हे आजीचं सांगणं असायचं. आजीनं सांगितलेल्या चातुर्मासातील गोष्टी या अजूनही लख्ख आठवतात. अर्थात मी तिची दुधावरची साय. त्यामुळे आई बाबांचा ओरडा आणि आजीचं पाठीशी घालणं हे ठरलेलं. आजही आजीचा डोक्यावरून फिरणारा हात, क्षणार्धात सगळा थकवा पळवून लावतो आणि विचारांच्या धावत्या गाडीला आळा बसतो. माझा परीक्षांच्या काळात आजीने माझ्यासाठी वाचलेली स्तोत्रं. कंपनी लॉ च्या पेपरआधी एकदा झोपच येईना. सगळे प्रयत्न केले पण शेवटी आजीने उठून डोकं चोळून दिलं आणि आत्तापर्यंतची सगळ्यात भारी झोप लागली. आजही, बिघडलेलं संतुलन हे मनाचं असो वा शरीराचं, ती आमच्या पाठीशी खंबीर उभी असते. अशा माझ्या आजीची ओळख एखादी कविता वाचावी आणि वयागणिक त्याच कवितेचा अर्थ नव्यानं कळत जावा, तशी काहीशी होत आहे मला.

ree

लहानपणीच तिची आई वारली. सावत्र आई आणि त्या दोन बहिणी. साधारण सिनेमातील सावत्र आई जसा दुस्वास करते, तसा तिच्या वाटेला आला. दिसायला सावळी, उंचीनं जेमतेम, म्हणून लग्न देखील त्या काळाच्या मानाने उशिराच झालं. पण नियतीने तिच्या आयुष्याला कलाटणी देणारं वळण हे माझ्या आजोबांच्या रुपानं आणलं. माझे आजोबा - श्री. शरद देवधर. राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यकर्ता व भारतीय मजदूर संघाचे 'अखिल भारतीय सचिव '. त्या काळात labour conference साठी भारताचं प्रतिनिधित्व करून अमेरिकेला जाऊन आलेले. राष्ट्रासाठी नोकरी सोडून पूर्ण वेळ कार्यकर्ता असलेले. आता या पार्श्वभूमीवर व आजोबांच्या जीवनआलेखावरून हे लक्षात येतं की या कार्यात सर्वात मोठा उचलणारी व्यक्ती ती म्हणजे माझी आजी.


लग्नानंतर रोज कर्जत ते फोर्ट हा प्रवास...सेल्स टॅक्स मधून गॅझेटेड ऑफिसर म्हणून आजी सेवानिवृत्त झाली. आजोबांनी रेल्वेची नोकरी सोडल्यानंतर आजीनंच घर खर्चाची आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी एकहाती पेलली. आजीच्या संमतीनेच आजोबांनी हा निर्णय घेतला होता परंतु राहून राहून आश्चर्य वाटतं ते म्हणजे आजीनं त्यांना दिलेल्या पाठिंब्याचं आणि कठीण निर्णय सहजीने निभावण्याचं.


दुधात साखर विरघळावी आणि त्याच्या गोडव्याने संसार फुलावा, तसं काहीसं झालं त्या दोघांचं. कर्जतवरून मुक्काम डोंबिवलीला हलला, पण आणीबाणीच्या काळात आजोबा तुरुंगात गेले आणि स्व कष्टानं कमावलेलं चांगलं २BHK चं घर सोडावं लागलं. मग ठाण्यातील चाळीत त्यांचा संसार सुरू झाला. चाळीतल्या समस्या या काही वेगळ्या सांगायला नकोत, त्यांना रोजच्या रोज तोंड देत सर्व चालू होतं. घरी सतत कार्यकर्त्यांची ऊठबस असायची. पण या सगळ्यात देखील आजी अतिशय शिस्तबद्ध राहिली. ती आत्ताही सांगते, ' मी कधीही बाहेरचं खाल्लं नाही, वेळेवर झोपले - उठले. वेळ नेहमी चिमटीत पकडून ठेवावा आणि कायम दोन प्याद्यांची योजना आखावी.' हे सगळं का तर आजोबांनी घेतलेली मोठ्या कुटुंबांची (राष्ट्रकार्याची)जबाबदारी समोर ही छोटस कुटुंब तर मी सहज सांभाळू शकते, असं तिचं म्हणणं.


हुशार मुलांचा पेपर हा नेहमी कठीणच निघतो आणि नियती त्यांचीच परीक्षा बघते या न्यायाने आजीची सेवानिवृत्ती आणि काही महिन्यांतच आजोबांचं देवाघरी जाणं, ही घटना पचवणं कठीण होतं. आजही आजोबांच्या आठवणी सांगताना तिचे डोळे पाणावतात. तशाही परिस्थितीत तिची देवावरची श्रद्धा निश्चल राहिली. ' जे लिहून ठेवलं आहे ते चुकणे नाही आणि त्याला धीराने सामोरं गेलं पाहिजे. देव शक्ती देतोच ', हे ते अजूनही मला सांगते. ती मुळातच Iron Lady आहे आमच्या घरातली.


माणसानं पाण्यासारखं असावं, जिकडे जाईल तिकडचा आकार धारण करावा हे तिचं सांगणं आणि वागणही तसंच. बदल स्वीकारणारी, आजोबांच्या खांद्याला खांदा लावून देशकार्यात योगदान दिलेली, स्वकष्टाने घरखर्च चालवणारी, मुलांवर उत्तम संस्कार करणारी, योग्यवेळी व्यावहारिक, स्वयंसिद्धा, आजही स्वतःची कामं करून इतरांना मदत करायला सज्ज असलेली, उत्तम प्रवासी आणि उत्साही अशी ही माझी सुधा आजी.


महाराष्ट्रातील क्रांतीसुर्यांच्या पत्नी यशोदाबाई (बाबाराव सावरकरांच्या पत्नी), यमुनाबाई (तात्याराव सावरकरांच्या पत्नी), शांताबाई (नारायणरावांच्या पत्नी), सत्यभामाबाई (लो. टिळकांच्या पत्नी) आणि त्यांच्या त्यागाचा इतिहास हा अत्यंत विशाल. या इतिहासाच्या पाऊल खुणांवर शक्य असलेल्या स्वरूपात देशकार्य करून चालता आलं तर ते आपलं अहोभाग्यच. माझी आजी देखील यांचाच आदर्श ठेवणारी आणि माझ्यासाठी माझ्या घरात ती स्वतः आदर्श ठरलेली. माझी आजी खरोखरीच मला अलीकडेच कळली - वळली; जेव्हा माझं कळण समृद्ध झालं.


तुमच्याही घरात/कुटुंबात असे प्रेरणास्रोत असतीलच.

आठवा आणि कोणतं नातं किंवा नांव मनात उमटतं ते सांगा.

1 Comment


Bharat Anikhindi
Bharat Anikhindi
Sep 24

फार छान हृदयस्पर्शी

Like
20220810_161701_edited.jpg

Hi, thanks for dropping by!

This site will be used to publish the series of blogs sharing the stories from the north east part of India and the experiences of living across the villages of Arunachal and Manipur states.

bottom of page