मा. माईंस...सा.न.वि.वि. (चले निरंतर चिंतन मंथन)
- Vedanti Vaidya
- Sep 25
- 3 min read
मा. निवेदिता भिडे. १९७७ पासून विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती कार्यकर्ता. वर्तमानात All India Vice President चे दायित्व. शिक्षार्थी व केंद्राच्या शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण, VKIC (Vivekananda Institute of Culture) च्या समन्वयक, VIF (Vivekananda International Foundation) च्या विश्वस्त पदाची जबाबदारी. भारतात व भारताबाहेर (ऑस्ट्रेलिया अमेरिका) योग, अध्यात्म, भारतीय जीवनपध्दती व दर्शन इत्यादी अनेकविध विषयांवर सेमिनार, सेशन्स मधे सहभागी झालेल्या वक्त्या. विचार मांडण्यासोबतच त्यांना शब्दबद्ध करण्याची क्षमता आणि त्यान्वये प्रकाशित झालेली १५ हून अधिक पुस्तके.आपल्या कार्यातून विश्वबंधुत्वाचा संदेश देण्यासाठी पदवी व पुरस्कारांनी पुरस्कृत आणि या सेवाव्रतासाठी पद्मश्रीने गौरविलेल्या मा. निवेदिता भिडे (विवेकानंद केंद्र जीवनव्रती कार्यकर्ता).

पण माझ्यासाठी त्या माईच. माई म्हटल्यावर आपसुकच डोळ्यासमोर अत्यंत प्रेमळ व्यक्तिरेखा उभी राहते. शिबिरासाठी गेले असताना, काही कार्यकर्ते निवेदिता ताईंना माई म्हणत होते. तेव्हाच ठरवलं; आपणही माईच म्हणायचं. लहानपणी उंच माझा झोका किंवा तो काळ दर्शविणाऱ्या सीरियल किंवा सिनेमांत माई ही भूमिका असायचीच. माझा बाबा त्याच्या आजीला माई म्हणायचा. त्यानं तिचं केलेलं वर्णन आणि माईंचं वागणं यात काहीतरी जुळणारं सापडलं आणि यांना माईच म्हणावं वाटलं. माई अशी हाक मारत आमचं नातं अजून जवळचं - घट्ट करावं वाटलं.
मी त्यांना पहिल्यांदा बघितलं व ऐकलं ते North East Calling या कार्यक्रमात. ईशान्य भारतातील केंद्राच्या सेवाकार्याचा परिचय त्या करून देत होत्या. ' सेवा, संस्कृती व समन्वय या त्रिसूत्रींवर काम केलं जातं. तसंच, दोन संस्कृतीतील फरक न शोधता त्यांतील समानता शोधली जाते. त्यांतील एकरूपता समजून घेण्याच्या दृष्टीने अभ्यास होतो', या विचारमांडणीनेच मी भारावून गेले. त्यांनी केलेलं आवाहन मनात घोळलं आणि एक वर्ष काम करण्याचा योग साधला गेला. त्यांच्याशी बोलावं वाटलं, पण मी काय बोलू शकेन असा विचार करून गप्प बसले.
सेवाव्रती शिबिर पूर्ण झाल्यावर शेवटच्या दिवशी थोडं अंग मोडून आलं. आम्ही बाहेरून आलो व जेवायला जाताना माई भेटल्या. मणिपूरला जाताना काय काय कर अशी अवघी दोन मिनिटं चर्चा झाली आणि निघताना त्यांनी मला विचारलं, ' वेदांती, काय गं, बरं नाही का वाटते तुला? मी स्तिमित झाले. त्यांच्या कसं लक्षात यावं. तोपर्यंत घरातले,सख्ख्या मित्र मैत्रिणी याव्यतिरिक्त कोणी बारकाईने बघेल आणि असं काही विचारेल, असं डोक्यातही नव्हतं. १५ दिवसांपूर्वी आलेल्या माझ्याकडे त्यांचं लक्ष गेलं हेच खूप सुखावह होतं. इतक्या लवकर कोणीतरी (घरच्यांन व्यतिरिक्त) आपलंस केलं ही भावनाच छान होती.
तत्क्षणी मला दोन गोष्टी लक्षात आल्या - एक म्हणजे माझ्या कुटुंबाचा परीघ वाढला आहे आणि मला अजून एक घर मिळालं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मलाही तिथे जाऊन सर्वांशी असंच वागायचं आहे. कार्यकर्त्यांवर लक्ष आणि त्यांची काळजी घ्यायची आहे. त्यानंतरच्या मणिपूर ते अरुणाचल या प्रवासात देखील मानसिक व वैचारिक समतोल राखण्यात माई सोबत होत्या.
ईशान्येवरून परतताना राष्ट्रीय शिबिरात, कन्याकुमारीत माईंसोबत एका संध्याकाळी आम्हाला वॉक घ्यायची संधी मिळाली. वेळ सूर्यास्ताची;छान हवा सुटलेली;दूरवरून भजनाचे सूर कानावर पडत होते;पक्षी किलबिलाट करत घरट्याकडे परतत होते; रस्त्यांवर पिवळ्या फुलांचा सडा पडला होता आणि अशा वेळी आम्ही माईंसोबत गप्पा मारत चालत होतो. गुरुनं शिष्याला धरून ठेवावं की शिष्याने गुरूला असा प्रश्न त्यांना विचारला, तर माई म्हणाल्या या काळात मार्जार भक्ती (मांजर जसं पिल्लाला पकडून नेते) आणि मर्कट भक्ती (माकडचं पिल्लू कसं आईला बिलगुन असतं) दोन्हीही आवश्यक. गुरुनं शिष्याला अन् शिष्याने गुरूला धरून ठेवावं. निघताना माईंनी पाठीवर थोपटलं, इतकं छान वाटलं म्हणून सांगू! अशा या माई.
कर्तृत्वानं मोठ्या परंतु अत्यंत साधं राहणीमान. विचार मांडताना करारी पण तितक्याच ऐकताना receptive. सहज संवाद साधू शकणाऱ्या - approachable. सहसा उच्चपदस्थ - उच्चशिक्षित - समाजमान्य कर्तृत्ववान माणसं ही सामन्यांना एखाद्या बंद पुस्तकासारखी वाटतात. परंतु स्वामी विवेकानंदांचे विचार जगणाऱ्या माई म्हणजे. आपल्यातील शक्तीची जाणीव करून देणाऱ्या आणि ती जागृत करण्यास मदत करणाऱ्या.
लेखन, वाचन, वक्तृत्व, भाषांवरील प्रभुत्व, सेवाकार्याचा ध्यास आणि निरंतर चिंतन - मंथनाचा प्रवास करणारं हे विलक्षण नेतृत्व. मोठी माणसं ही मनानं देखील मोठीच असतात, याची प्रचिती आली. ' विद्या विनयेन शोभते', हा आमच्या शाळेचा विचार प्रत्यक्षात अनुभवास आला.
शेवटी त्यांच्याकडे बघून सावरकरांच्याच ओळी आठवतात...
की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
लब्धप्रकाश इतिहास- निसर्ग - माने
जे दिव्य दाहक म्हणुनी असावयाचे
बुद्ध्याचि वाण धरिले करी हे सतीचे.
Comments