top of page
  • Vedanti Vaidya

एका वीरांगनेची गाथा: सरस्वती राजमणी

  सरस्वतीचं खरं नाव हे 'राजमणी'. तमिळनाडूच्या श्रीमंत, सुसंस्कृत व राष्ट्रप्रेमी घरात तिचा जन्म झाला तो 11 जानेवारी, 1927 साली. संपूर्ण कुटुंब गांधीप्रेमी. 1920 च्या असहकार आंदोलनाचे वारे देशभर वाहत होते. गांधींसोबत लोकं आपल्या नोकऱ्या, व्यवसाय सोडून त्यात सहभागी झाले होते. अहिंसेच्या मार्गाने जनआंदोलन करून स्वातंत्र्य मिळवायचे या कल्पनेने सर्व काही भारून गेले होते. त्या काळात व्यवसाय करून स्वातंत्र्य चळवळीसाठी पैसा उभा करायचा तर भारतात राहून ते करणं सोप्प नव्हतं. म्हणून भारतातील अनेक कुटुंबं शेजारील देशांत गेली. रंगून (आत्ताचे yangon) हे बर्मा अर्थात म्यानमारमधील तेव्हाचे सर्वात मोठे शहर. जे ''London of the East'' म्हणून प्रसिद्ध होतं ते तिथे चालणाऱ्या विविध व्यवसायांमुळेंच. राजमणीचं कुटुंबदेखील रंगूनला राहावयास गेलं. हळूहळू प्रगती करत तिच्या वडिलांनी सोन्याची खाण विकत घेतली. त्यांच्या व्यवसायाचा जम उत्तम बसला होता आणि ते स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्याचं काम देखील अविरत करत होते. राजमणीचा जन्म रंगूनचाच. हळूहळू मोठे होताना भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बातम्या आणि गांधींचे विचार तिच्या कानांवर पडत. त्यातच 1931 साली भगतसिंगला फाशीची शिक्षा ठोठावण्यात येण्याची सूचना रेडिओवर ऐकून घरातलं वातावरण गंभीर झालं. त्यावेळी 10 वर्षीय राजमणीला ''कोण हा भगतसिंग? त्यानं काय केलंय? त्यांना फाशी का मिळाली?'', असे प्रश्न पडले. भगतसिंगबद्दल अजून वाचले असता तिच्या आयुष्यात तिने आत्तापर्यंत वाचलेल्या, ऐकलेल्या अशा व्यक्तींमधलं हे अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व ठरलं आणि आपणही असेच काहीतरी करावे असे तिला वाटू लागले. एकदा तिच्या घरी गांधीजी आले असता घरातील सर्व जण एकेक करत त्यांना भेटले;पण राजमणी मात्र गायब होती. ती घरापाठच्या बागेत होती तेव्हा गांधी तिथे गेले. राजमणी तेव्हा बंदूक चालवण्याचा सराव करत होती. ते बघून गांधींनी तिला सशस्त्र क्रांती व हिंसेने स्वातंत्र्य मिळवणं हे अयोग्य असून अहिंसेनेच ते का व कसं मिळवायला हवं हे समजावलं. ''ब्रिटिश पण तर हिंसा करतात. मग ते करतात ते चूक नाही का? आणि चूक असेल तर त्यांना शिक्षा नको का मिळायला?'', असे प्रश्न तिला पडले पण राजमणीने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं;परंतु ते निघून गेल्यावर पुन्हा ती बंदुकीच्या सरावास लागली.

       भगतसिंगच्या फाशीचा उघड विरोध तेव्हा केवळ एकाच व्यक्तीने केला; ते होते 'नेताजी सुभाषचंद्र बोस'. गांधींच्या केवळ अहिंसा मार्गाने स्वातंत्र्य मिळवायच्या कल्पनेहून वेगळा मार्ग त्यांच्या मनात होता. स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर देशाकडे त्याची सशस्त्र व स्व-शस्त्र सेना असणं आवश्यक आहे हा त्यांचा विचार होता आणि त्यासाठी त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. लहानांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांना त्यांनी या क्रांतीत सहभागी करून घेतलं.

       1939 पासून दुसऱ्या विश्वयुद्धाला सुरुवात झाली. त्यामुळे ब्रिटिशांवर दुहेरी संकट आले होते. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने सुभाषबाबूंनी जपानशी मैत्री केली. आपले भारतीय सैनिक जे ब्रिटिश आर्मीकडून जपानविरुद्ध लढले होते आणि जपानने त्यांना युद्धकैदी केले होते, अशा 30,000 जणांची सुटका करून त्यांना आझाद हिंद सेनेत भरती केले. आझाद हिंद सेनेत 40,000 सैनिकांची कुमक होती तर जपानकडून 80,000 सैनिक शामिल होते. जपानच्या मदतीने इंफाळ (मणिपूर) आणि कोहिमा (नागालँड) येथून युद्धाला सुरुवात करायची असं ठरवण्यात आलं. हा काळ होता 1942 चा. या सेनेचे 2 भाग. एक सैनिक आणि दुसरा गुप्तहेर. हे गुप्तहेर भारतात येऊन सुभाषबाबूंना ब्रिटिशांच्या गोटातील माहिती देत असत आणि त्यानुसार हे चढाईच्या रचना ठरवत.

       असे नेताजी...त्यांचा राजमणीवर प्रभाव पडला नसता तर नवलच! त्यांच्या भाषणाचा एकेक शब्द ती रेडिओवरून ऐकून लिहून काढायची. भारताला स्वातंत्र्य सुभासबाबूंच्याच मार्गाने मिळू शकतं हा तिचा ठाम विश्वास होता. त्यांच्या Indian National Army (INA) मध्ये प्रशिक्षण घेण्याची तिची इच्छा होती. सुभाषबाबूंना भेटण्यासाठी ती आतुर होती. तेव्हा स्वातंत्र्य चळवळीसाठी निधी उभारणी प्रीत्यर्थ ते रंगूनला येणार असल्याची बातमी तिला शाळेतुन येताना मिळाली. त्यांचे कडाडते भाषण तिने ऐकले. ''मेरी एक ही इच्छा है - मरने की; ताकी भारत जी सके'' और ''तुम मुझे खून दो - मैं तुम्हे आझादी दूंगा', या आवाहनांनी तिचे मन भारून गेले. त्यांच्या निधी उभारणीच्या आवाहनासाठी तिने स्वतःचे दागिने दान केले आणि तो क्षण आला...नेताजी खुद्द दागिने परत करण्यासाठी तिच्या घरी आले. पण तेव्हा राजमणीने दागिने परत घेण्यास नकार दिला. उलटपक्षी नेताजींना तिने तिची INA मध्ये प्रशिक्षणाची इच्छा बोलून दाखवली. तेव्हा 'तू अजून वयाने लहान आहेस', असं ते तिला समजावू पाहत होते. पण ती तिच्या विचारांवर अढळ होती. 'मी लहान असले तरी मलाही देशासाठी काहीतरी करायचे आहे. तुम्ही मला INA मध्ये संधी दिलीत तरंच मी दागिने परत घेईन', हे ऐकल्यावर नेताजींना तिच्यातलं वेगळेपण जाणवलं आणि त्यांनी तिला INA मध्ये प्रशिक्षणाची संधी दिली. राजमणीचा त्या दिवशी दुसरा जन्म झाला तेही सरस्वतीच्या रूपात...लक्ष्मी येते तशी जाऊही शकते पण सरस्वती एकदा आली की कायम असते आपल्यासोबत आणि विवेकबुद्धीची देवता असल्याने राजमणीचं नाव नेताजींनी 'सरस्वती' ठेवलं आणि तिच्या आयुष्याच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली...तेव्हा तिचं वय होतं फक्त 16....

        INA मध्ये तिला प्रथम नर्सिंग च प्रशिक्षण देण्यात आलं. ती जबाबदारी निभावताना देखील तिचं मन मात्र सैनिकी शिक्षणाकडे ओढ घेत होतं. तिने एकदा एका INA च्या सैनिकाला ब्रिटिश सैनिकाकडून पैसे घेताना बघितलं आणि लगेच तिने ती गोष्ट सुभाषबाबूंच्या कानांवर घातली. ती नर्सिंग हूनही अधिक करू शकते याची जाणीव त्यांना त्या घटनेने झाली. त्यामुळेच तिला INA च्या सैनिकी प्रशिक्षण शिबिरात भरती करण्यात आलं. हे शिबीर रंगून पासून 7 मैलांवर होतं. त्यात तिच्यासारख्या अनेक मुली होत्या. रोज सकाळी 4 ला उठून विविध प्रकारचे व्यायाम, बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण, युद्धकला, ऊन-पाऊस-थंडीतही अविरत प्रयत्न करत हे शिबीर पार पडलं. प्रचंड कष्टाचे जरी ते दिवस असले तरी ते तिच्या आयुष्यातले अविस्मरणीय दिवस होते. शरीर, मेंदू आणि मन या तिनही अंगांनी त्यांना कणखर बनवण्यात आलं. या प्रशिक्षणात तिची गट्टी दुर्गा या अजून एका मुलीशी जमली. दुर्गा आणि सरस्वती - शक्ती आणि बुद्धी ची ही जोडगोळी पुढेही एकत्र कार्यरत होती.

      तो काळ मुली आणि साडीचे समीकरण असलेला. पण INA मध्ये मुलींना सैनिकी वेष होते. सैन्यात women’s unit आणणारे हे पहिले नेताजीच असावेत. कारण जेव्हा नेताजींनी मुलींना सांगितले की, 'बंदूक शिकवली जरी असली तरी ती सीमेवर चालवण्याची संधी मला तुम्हाला देता येणार नाही', तेव्हा INA तील मुलींनी त्यांची बोटं कापून स्वतःच्या रक्ताने नेताजींना पत्र लिहिले आणि त्यांच्या एकनिष्ठता आणि निर्धाराची ग्वाही दिली. ते बघता नेताजींनी Rani Jhansi Regiment स्थापना केली. त्यात दुर्गेला आणि सरस्वतीला खास काम देण्यात आले.

इथूनच सुरू झाला तिच्या आयुष्याचा तिसरा अध्याय...

       राजमणीची सरस्वती आणि आता सरस्वतीचा झाला मणी..त्या दोघींचे केस कापले आणि आणि त्यांना मुलगा म्हणून ब्रिटिशांच्या सैनिकी शिबिरात आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या घरांत वरकामाला जाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. तिने कधीही विचार केला नव्हता अशी गुप्तहेराची भूमिका तिच्या वाट्याला आली. ब्रिटिश अधिकाऱ्यांचे कपडे धुणे, इस्त्री करणे, बूट पॉलिश करणे, घरकाम करणे, तसेच सैनिकी शिबिरातील साफ-सफाईची कामे करणे, बागकाम करणे या कामांमागे अडून जी मिळेल ती माहिती INA ला पोचवणे, त्यांचे प्लॅन्स शोधून काढणे, महत्वाची कागदपत्रे आणि शस्त्र देखील हस्तगत करणे ही जबाबदारी त्यांच्यावर होती. तिच्या शोधक नजरेनं कमी वेळातच कुलूप तोडून बंद दारांमागील रहस्य शोधून काढण्यात ती लिलया पटाईत झाली. दुसऱ्या विश्वयुद्धातील ब्रिटिशांची पुढची चाल काय असेल याबद्दल विशेषकरून माहिती काढण्याचे आदेश सुभाषबाबूंनी दिले होते. त्यांच्या माहितीवर आधारित ब्रिटिश जेव्हा अत्यंत कमजोर असतील त्या क्षणी इंफाळ व कोहिमातून हल्ला करण्याचा त्यांचा मानस होता. ही भूमिका निभावत 1 वर्ष सरलं आणि एक दिवस तिची मैत्रीण दुर्गा पकडली गेली. आता मणीसमोर 2 पर्याय होते. एक तर तिला सोडून परतायचा किंवा तिला सोडवून तिच्यासोबत परतायचा. ती बर्माचे स्थानीय मुलींचे कपडे घालून साफसफाई कर्मचारीच्या रूपात दुर्गाला ठेवलंय त्या कैदेत शिरली. तिने बनवलेल्या प्लॅन नुसार तिने ब्रिटिश अधिकाऱ्याची नजर चुकवून दुर्गेला सोडवले. तो क्षण जन्म-मरणाचा होता. एक चूक आणि दोन जीव टांगणीला लागले होते. त्या दोघी देखील जीव ओतून पळू लागल्या. परंतु थोड्याच वेळात ब्रिटिश अधिकाऱ्यांना कळले असता त्यांनी त्या दोघींचा पाठलाग सुरू केला. त्याचसोबत गोळीबारही सुरू केला. त्यात पळताना सरस्वतीच्या पायाला गोळी लागली. तिला पळणं सोडाच पण उठतानाही त्रास होत होता. तिने दुर्गेला पुढे व्हायला सांगितले असता दुर्गेने पण तिची साथ सोडली नाही. ती तिला आधार देत पुढे जाऊ लागली. शेवटी त्या दोघीही एका झाडावर चढून लपल्या. 3 दिवस - सलग 3 दिवस त्या दोघी तिथे लपून राहिल्या, कारण खाली ब्रिटिश त्यांना शोधत होते. त्यांचा वावर थांबल्यावर त्या खाली उतरल्या. सरस्वतीच्या पायाची जाणीव शून्य झाली होती. पण सुभाषबाबूंना निराश करायचं नाही आणि जिवंत शिबिरात परतायचं या निर्धाराने त्या दोघी 8 तासानंतर शिबिरात पोहोचल्या. शिबिरातील सर्वांनाच त्यांना बघून आश्चर्याचा धक्का बसला. हा सरस्वतीच्या पुनर्जन्माचा क्षण ठरला. या क्षणाने अशा अनेक सरस्वतींची कहाणी आपल्यापर्यंत पोहचू शकली. नेताजींनी तिच्या बहादुरीसाठी तिला पत्र लिहिले. जपानच्या emperor ने तिला पदक बहाल करून गौरव केला आणि तिला INA तील Rani Jhansi Regiment ची लेफ्टनंन्ट हा किताब देऊन गौरविण्यात आले.

       सरस्वती राजमणी - INA तील सर्वात तरुण व लहान महिला गुप्तहेर. 14 एप्रिल 1944 ला मणिपूर मधील Moirang तालुक्यात INA ने स्वतंत्र भारताचा झेंडा पहिल्यांदा फडकवला. 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरस्वतीचे कुटुंब आपली सर्व संपत्ती दान करून भारतात परतले. त्यांनतर  तब्बल 1971 नंतर INA च्या सैनिकांना स्वातंत्र्यसेनानी म्हणून घोषित केले गेले. 2006 मध्ये चेन्नईतील पूरग्रस्तांना मदत म्हणून सरस्वतींनी आपले संपूर्ण पेन्शन दान केले. त्यांचे तामिळनाडूतील घर हे नेताजींची स्मरणिकाच होती. त्यांच्या आराध्याच्या - नेताजींच्या मृत्यूचं न सुटलेलं कोडं सोडवायलाच कदाचित त्यांनी 13 जानेवारी 2018 ला शेवटचे श्वास घेतले.

       त्यांच्या जगण्याचा मूलमंत्र हा "I can is always greater that IQ" आणि "Good heart is equivalent to great minds" हा होता.

 विचारमंथन:

1.       1937 साली बर्मा व भारत ब्रिटिशांनी विभागला. विभाजनाचं कारण अर्थातच फोडा आणि राज्य करा नीतीचा उपयोग आणि Burmese Nationalist Movement चा आधार काढून घेऊन ती बंद पाडणं हा उद्देश. अखंड भारतात POK सोबतच अजून कोण-कोणते प्रांत होते आणि आता जोडले जाऊ शकतील?

2.       जसं आज वेदांचा अचूक काळ शोधण्यासाठी सरस्वती नदीचा उगम व प्रवाह शोधण्याची आवश्यकता आहे, तसंच या सरस्वतीचा देखील जीवन प्रवास पुनः प्रवाहित करायची गरज आहे. अशा अनेक जणींना खरं खुरं अमरत्व हे खरं तर त्यांना पुन्हा पुन्हा आठवूनच मिळेल असं वाटतं. अशा कितीतरी सरस्वतींच्या कहाण्या अजूनही लुप्त आहेत.

3.       बर्मा (म्यानमार) हे भारतात होतं. तो भाग greater India म्हणून ओळखला जायचा. पण अशास्त्रीय विभाजन झालं आणि आजही म्यानमार आणि भारत त्या जखमेने धुमसत आहे. मिझोरम-म्यानमार सीमेवरील ताण हे त्या अशास्त्रीय विभाजनाचे परिणाम असावेत का?

4.       सरस्वती व तिच्या कुटुंबाची मानसिकता:

·       घर श्रीमंत, व्यवसायिकाचं आणि मुख्यत्त्वे गांधीवादी असूनही तिचे विचार हे मात्र सशस्त्र क्रांतीचे. 10 वर्षीय मुलीने तिच्या आजूबाजूचं वातावरण गांधीवादी असताना खुद्द गांधींनी तिला समजावून देखील सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वनिर्णयाने निवडण्याचं धारिष्ट्य दाखवलं आणि तो निर्णय निभावलादेखील. एवढी विचारांची स्पष्टता!

·       तिच्या आई-वडिलांची विचारधारा ही अहिंसेची आणि त्यांच्या मुलीची मात्र सशस्त्र क्रांतीची असताना त्यांनी देखील एक पालक म्हणून तिला कसं समजून घेतलं असेल? त्या काळात एका मुलीला असा पाठिंबा देणं तेही स्वतःची विचारधारा वेगळी असताना हे खरंखुरं स्वातंत्र्य आणि विविध विचारधारेचा आदर दर्शवत नाही का? एक पालक म्हणून कसं असावं हे या उदाहरणाकडे बघून खरोखर आत्मसात करावं असं आहे.

जटिल वास्तविकता:

आजकाल वयाच्या 16 व्या वर्षी मुलांना कोणत्या content ला expose करतो, त्यांच्यासमोर आदर्श म्हणून कोणाला ठेवतो आणि यशाची व्याख्या म्हणून कशाचं परिमाण मांडतो, हा खरोखर विचार करण्याजोगा भाग वाटतो.

 

आवाहन:

ही वर दिलेली YouTube वरची सरस्वती राजमणीची video story आपल्या घरातील पुढच्या पिढीला नक्की दाखवूया. क्रांतिकारक हे देखील अनेक रूपांत असतात ही नजर त्यांना द्यायचा प्रयत्न करूयात.

 

।। जय हिंद ।।

4 views0 comments

Recent Posts

See All

Comments


20220810_161701_edited.jpg

Hi, thanks for dropping by!

This site will be used to publish the series of blogs sharing the stories from the north east part of India and the experiences of living across the villages of Arunachal and Manipur states.

bottom of page